Monday, February 17, 2014

धिंगाणा बंद Dhingana Closed!!

अखेर ७ वर्षांनंतर धिंगाणा डॉट कॉम बंद झाले. प्रेम दिनाच्या दिवशीच त्यांनी अखेरचा राम राम केला. अनेक मराठी रसिकांचे हक्काचे गाणे ऐकण्याचे ठिकाण बंद झाले. पडद्यामागच्या हालचाली आपल्याला काय माहिती पण स्वप्नील आणि स्नेहल या शिंदे बंधूनी सुरु केलेले आणि भारतात कायदेशीरपणे संगीत ऐकण्याचे हे प्रथम स्थळ होते. 

मला आठवतंय २००७ मध्ये पुण्यात आय टी मध्ये नवीनच भारती झालेले आम्ही मिट कॉन च्या इमारतीत प्रशिक्षण घेत होतो. सगळेच नुकतेच महाविद्यालयातून बाहेर पडलेले, वेगवेगळ्या गावातून आणि राज्यांतून आलेले सगळेच जन तसे संगीताचे चाहते होते. पण आता इकडे कॉलेज सारखे गाणे ऐकणे जमणार नव्हते तेव्हा एका मित्राने धिंगाणा दाखवली आणि मग आमचे रोजचे गाणी ऐकणे सुरु झाले. त्याकाळी जेव्हा टोरांट जोरात होते आणि कायदेशीर असे काही मिळते हे माहिती नव्हते तेव्हा हा गाण्यांचा खजिना हातात पडला आणि आनंद झाला. 

त्यानंतर इकडे एम एस करायला आल्यापासून तर धिंगाणा कायमचा सोबती बनला. आमचा जुन्या गाण्यांचा छंद धिंगाणा निश्चितपणे पूर्ण करायचा. त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी गाण्यांचा संग्रह. धिंगाणा मराठी गाण्यांसाठी हक्काचे माहेर घर होते. पुढे पुढे तर बर्याच चित्रपटांच्या यशामध्ये धिंगाणा च्या गाण्यांचा महत्वाचा वाट राहिला आहे. टाईम पास, दुनियादारी, बालक पालक अश्या यशस्वी चित्रपटांचे संगीत सुरुवातीला धिंगाणा वरच प्रकाशित झाले. धिंगाणा चा अजून एक विशेष म्हणजे त्यांचे android आणि आय फोन आप. इतके सुंदर आणि वापरायला सोपे अजून कुठलेच नाही सध्या तरी. 

वाटले होते मराठी चित्रपट आणि त्यांच्या हातात हात घालून धिंगाणा असेच मोठे होतील पण अखेर त्यांनी निरोपच घेतला. अखेरच्या दिवसांत त्याचा टी सिरीज आणि बाकी कंपन्याशी काही वाद सुरु झाला होता आणि नवीन गाणी येणे ही बंद झाले होते. आता कळले ती शेवटची घर घर होती. असा धिंगाणा परत सुरु व्हावा अशी इच्छा तर आहे पाहू काय होतंय ते …                      

No comments:

Post a Comment